संगमनेर -संगमनेर शहर पोलिसांनी मालदाड रस्त्यावरील एका घरावर छापा घालून सुमारे 6 लाख 16 हजार रुपये किमतीचा 77 किलो गांजा जप्त केला. यावेळी सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि.20) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान करण्यात आली.
मालदाड रस्त्यावरील कटारीयानगर येथील शंकर टाऊनशीप येथील पहिल्या गल्लीतील एका घरात गांजा असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या घरावर छापा घालण्यात आला. यावेळी घरात जययोगेश्वर दगू गायकवाड (रा. रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव, हल्ली रा. शंकर टाऊनशीप)
दीपक सुरेश तुपसुंदर (रा. खांडेश्वर मंदिराजवळ, खांडगाव) व विशाल निवृत्ती आरणे (रा. रांजणगाव देशमुख, ंता. कोपरगाव, हल्ली रा. मालदाडरोड) हे तिघे उपस्थित होते. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, चार वेगवेगळ्या पांढऱ्या रंगांच्या गोण्यांमध्ये हा गांजा भरून ठेवला असल्याचे आढळून आले.
दोन गोण्यांमध्ये प्रत्येकी 23 किलो 160 ग्रॅम वजनाचा, तिसऱ्या गोणीत 24 किलो 110 ग्रॅम वजनाचा व चौथ्या गोणीत 6 किलो 905 ग्रॅम वजनाचा, 6 लाख 16 हजार रुपयांचा 77 किलो 335 ग्रॅम गांजा आढळून आला.
यावेळी आठशे रुपयांचा वजनकाटा व 144 रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्या, तसेच 3 लाख 10 हजार रुपये किंमतीची कार (क्र. एमएच-14 बीआर-9484), 60 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल संच, असा एकूण 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व सदर घराला सील ठोकले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल आयुब शेख, पो. कॉ. सचिन उगले व महाले आदींनी केली.