Army Day Parade : रविवारी (१५ जानेवारी) लष्कर दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीत आयोजित करण्यात येणारी आर्मी डे परेड प्रथमच राजधानीबाहेर आयोजित केली जात आहे. या वर्षी आर्मी डे परेडचे आयोजन एमईजी अँड सेंटर, बेंगळुरूच्या परेड ग्राउंडवर करण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बेंगळुरू येथील गोविंदस्वामी परेड ग्राउंडवर आर्मी डे 2023 च्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
आज 75 वा लष्कर दिन
1949 मध्ये सेलिब्रेशन सुरू झाल्यापासून 75 वा आर्मी डे दिल्लीबाहेर होणारा पहिलाच दिवस असेल. यावेळी सदर्न कमांड परिसरात आर्मी डे परेडचे आयोजन करण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल एम पांडे यांनी बेंगळुरूमध्ये सांगितले की, पहिल्यांदाच लष्कर दिन परेड आणि संबंधित कार्यक्रम राष्ट्रीय राजधानी दिल्लीबाहेर आयोजित केले जात आहेत. त्यामुळे लष्कराला जनतेशी जोडण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. मला खात्री आहे की यामुळे आमचे संबंध अधिक दृढ होतील.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, ‘पश्चिम सीमावर्ती भागात नियंत्रण रेषेवर युद्धविराम कायम असून, शस्त्रसंधी उल्लंघनात घट झाली आहे. पण सीमेपलीकडील दहशतवादी पायाभूत सुविधा अजूनही शाबूत आहेत. जम्मू आणि पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी सुरू आहे.’
लष्करप्रमुख म्हणाले, “अग्निपथ योजनेची सुरुवात करून एक ऐतिहासिक आणि प्रगतीशील पाऊल उचलण्यात आले आहे. आम्ही भरती प्रक्रिया स्वयंचलित केली आहे. देशातील तरुणांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुरुष अग्निवीरच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. अग्निवीरांच्या पुढील निवडीसाठी एक मजबूत प्रक्रिया विकसित केली.”