पुणे – पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला माहेरी जाण्यास भाग पाडले. या प्रकरणात पत्नीसह मुलांना दरमहा सात हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. फुलबांधे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ऑगस्ट 2022 पासून घटस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ही पोटगी द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
माधव आणि माधवी (नाव बदलेले आहे) यांचा विवाह 2005 साली झाला. यादरम्यान, त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. लग्नाच्या काही वर्षांत पतीसह त्याच्या कुटुंबीयांकडून माधवी यांचा छळ करण्यास सुरवात झाली. त्यानंतर, 2017 साली माधवी हिचे दागिने घेऊन तिला घरात येऊ न देता माहेरी पाठवून दिले. यादरम्यान, माधवी हिने पती विरोधात अॅड. गायत्री कांबळे यांमार्फत न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. तसेच, तिने स्वत:सह दोन मुलांकरीता अन्न, औषधे, मुलांचे शिक्षण तसेच दैनंदिन खर्चासाठी दहा हजार रुपये पोटगी मिळावी, अशीही मागणी केली.
पत्नीने केलेल्या अर्जावर माधव याने आक्षेप घेत माधवी ही परपुरूषाशी असलेल्या संबंधातून निघून गेली. तसेच, मुलांनाही घेऊन गेली. माझ्यावर अडीच लाखांचे कर्ज असून वडिलांच्या औषधोपचाराची जबाबदारी आहे. माधवी हिने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना माझा त्याग केला आहे. तसेच तिने मागणी केलेली पोटगीची रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे न्यायालयास सांगितले. न्यायालयाने पती व पत्नीच्या बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत माधवीला दरमहा 7 हजार रुपये अंतरिम पोटगी स्वरुपात द्यावेत, असे आदेश दिले.