Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झालीआहे. राज्यातील जनतेने कोणत्या पक्षाला निवडले हे निवडणूक निकालानंतर दुपारपर्यंत जवळपास स्पष्ट होईल. राज्यात 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका झाल्या. राज्यातील एकूण १९९ जागांसाठीची मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे.
आज सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसची भाजपशी तगडी स्पर्धा आहे. निकालापूर्वी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. शुक्रवारी वसुंधरा राजे सिंधिया यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
५ डिसेंबरपर्यंत आदर्श आचारसंहिता
मतमोजणीच्या संदर्भात राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता म्हणाले, ‘सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केले आहे आणि आदर्श आचारसंहिता 5 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे, त्यामुळे विजय मिरवणूक काढल्यास पोलिस कारवाई करू शकतात. असे त्यांनी म्हटले.
राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. 74.62% मतदान झाले आणि पोस्टल बॅलेटद्वारे 4,36,704 मते मिळाली. याशिवाय, आम्हाला अजूनही सेवा मतदारांची मते मिळत आहेत.”
मतमोजणीपूर्वी राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक
मतमोजणीपूर्वी राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ म्हणाले की, 19 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी राजस्थान कॉलेज आणि कॉमर्स कॉलेजमध्ये होणार आहे. आम्ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. वाहतूकही वळवण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणालाही मिरवणूक काढण्याची परवानगी नाही.