पुणे : पीएमपीच्या ताफ्यात पहिली 7 मीटर लांबीची ई-बस दाखल झाली आहे. सिंहगडासह बोपदेव घाट आणि मध्यवस्तीतील अरुंद रस्त्यावर चाचणी करण्यात येणार आहे. अरुंद घाट रस्त्यांवर प्रवासी सेवा पुरविण्यासाठी पीएमपीने 7 मीटर लांबीच्या 300 छोट्या ई-बस खरेदीचे नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने या खरेदी करणार आहे.
पीएमपी प्रशासन आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे सिंहगडावर ई-बस सेवा सुरू केली होती. मात्र, महिनाभरातच ही सेवा बंद करावी लागली. पीएमपीने येथे 9 मीटर लांबीच्या 12 ई-बसद्वारे प्रवासी सेवा पुरविण्यास सुरुवात केली होती. मात्र, घाट रस्त्यांवरील अरुंद वळणांवर बस वळवण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यातच सिंहगड घाट रस्त्यावरील तीव्र उतारावरील एका वळणावर ई-बसचा अपघात झाला. सुदैवाने कठड्यामुळे बस प्रवाशांसह बचावली. मात्र, घटनेची दखल घेत प्रशासनाने 9 ऐवजी 7 मीटर लांबीच्या नव्या 300 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या बस पीएमपी महापालिकेच्या साह्याने खरेदी करणार असून, 300 पैकी 1 बस नुकतीच दाखल झाली आहे. आता ही चाचणी यशस्वी झाल्यावर उर्वरित बस दाखल होतील.
घाट रस्त्यांवरील अरुंद मार्गावर सुरक्षित प्रवासी सेवा पुरवता यावी. याकरिता 7 मीटर लांबीच्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक बस भेकराईनगर आगारात दाखल झाली आहे. या बसद्वारे शुक्रवारपासून पुण्यातील विविध ठिकाणी चाचणी घेण्यात येईल.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल