पुणे, दि. 2 -शहरात पीएमपी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी पाच सीएनजी पंप आहेत; पण या पंपांवर दररोज लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे पीएमपीच्या चालकांना रात्री उशीरपर्यंत थांबावे लागत आहे. पंपांवर होणारी गर्दी लक्षात घेता पीएमपीसाठी उभारलेल्या पाचपैकी चार पंपांवर दीड महिन्यात आणखी एक डिस्पेन्सर बसविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा कमी होणार आहेत.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पीएमपीसाठी पाच सीएनजी पंप उभारण्यात आले आहेत. या पाच पंपांवर सीएनजी भरण्यासाठी लागणारे 11 डिस्पेन्सर आहेत; पण पीएमपीच्या सीएनजीवरील बस वाढल्यामुळे या पाच पंपांवर सीएनजी भरण्यासाठी गाड्यांना बराच वेळ थांबावे लागत आहे. त्यामुळे पीएमपीच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. न. ता. वाडी पीएमपी स्थानकावर तर रात्रीच्या वेळी सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लागते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पीएमपीकडून एमएनजीएलला प्रत्येक सीएमजी पंपावर एक डिस्पेन्सर वाढवून देण्यास वारंवार सांगितले जात होते. त्यानुसार गेल्या आठवड्यातच पीएमपीचे अधिकारी व एमएनजीएलचे अधिकारी यांच्यात बैठक झाली.
पीएमपीसोबत झालेल्या करारानुसार आता एमएनजीएलकडून चार पंपांवर प्रत्येकी एक डिस्पेन्सर वाढवून देण्यात येणार आहे. दोन महिन्यात चार पंपांवर एक डिस्पेन्सर सुरू केला जाईल. तर, पिंपरी नेहरूनगर स्थानकावर देखील डिस्पेन्सर वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. न. ता. वाडी येथे सध्या तीन डिस्पेन्सर असून, त्या ठिकाणी आणखी एक डिस्पेन्सर लवकरच उभारण्यात येणार आहे. कात्रज, हडपसर, कोथरूड या ठिकाणी एक डिस्पेन्सर वाढिण्यात येणार आहे, अशी माहिती “एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
पीएमपीसाठी सीएनजी पंप – कात्रज, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, पिंपरी
सीएनजीवरील बस – 1270
रोजचा सीएनजी – 95000 किलो
पीएमपीसाठी दर – 83.80 रु.