अंजली खमितकर
पुणे – वनविभागाच्या पुणे विभागाने कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या संचालकाविरुद्ध वन्य प्राण्यांच्या गैरव्यवस्थापनाबद्दल गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या प्रकरणाची आता महापालिका चौकशी करणार असून, येत्या दहा दिवसांत ती पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. वनविभागाने प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी जप्त केले असून त्यांचे स्थलांतरही करण्यात आले आहे.
14 सप्टेंबरला वनविभागाने प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. या प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन महापालिकेच्या अखत्यारित येते. त्यामुळे आता महापालिका या प्रकरणाची चौकशी करणार असून, दहा दिवसांनी त्याचा अहवाल तयार करणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये कात्रज येथील ‘डब्ल्यूएआरआरसी’मध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार वन्यजीव वॉर्डन आदित्य परांजपे यांच्याकडून वनविभागाला प्राप्त झाली होती. यानंतर वन अधिकाऱ्यांच्या पथकाने केंद्राला भेट दिली.
त्यांच्या तपासणी अहवालात, पथकाने नमूद केले आहे की त्यांना काही बंदिस्त प्राणी बेपत्ता झाल्याच्या नोंदी आढळल्या, काही प्राण्यांना बेकायदेशीरपणे बंदिवासात ठेवण्यात आले आणि अनेक प्राण्यांना वेगवेगळ्या अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर वनविभागाने नेमलेल्या सात सदस्यीय समितीने आणखी एक तपास केला. तथापि, अनुसूचित किंवा सर्वात संरक्षित प्राणी श्रेणीतील प्राण्यांचे व्यवस्थापन करताना गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिसाद समाधानकारक नव्हता.
त्यानंतर जुलैमध्ये 250 जनावरांना पुढील काळजीसाठी धर्मादाय ट्रस्टमध्ये हलवण्यात आले. ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. तेही सरकारी कर्मचारी असल्याने पुढील कारवाईसाठी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुक्तांना पत्रही पाठवण्यात आले आहे. त्या पत्राच्या आधारे महापालिका आयुक्त आधी त्यांची अंतर्गत चौकशी करणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
याशिवाय हे प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या अंतर्गत येते, त्यामुळे प्राथमिक जबाबदारी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे जाते. न्यायालयाने कायदेशीर जबाबदारी निश्चित केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की, प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काळवीट प्रजनन कार्यक्रम राबवला.
शिवाय, त्यांनी हे प्राणी वनविभागाला न कळवता प्रदर्शनात ठेवले. त्यामुळे प्राणीसंग्रहालय प्राधिकरणावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच या प्राण्यांचे योग्य तपशील राखल्याचे संग्रहालयाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात ते तपशील दिसत नाहीत, असे पुणे वनविभागाचे वन्यजीव वॉर्डन आदित्य परांजपे यांनी सांगितले.
250 पेक्षा अधिक प्राण्यांचे स्थलांतर
वनविभागाने यापूर्वी “डब्ल्यूएआरआरसी’मध्ये असलेल्या 250 पेक्षा अधिक प्राण्यांचे स्थलांतर केले आहे. यातील काही प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तर उर्वरित वनविभागाच्या संक्रमण उपचार केंद्रात असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.