पुणे – पीएमपी आणि मेट्रोचे तिकीट प्रवाशांना आता लवकरच एकाच कार्डवरून मिळणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर डेक्कन ते गणपती माथा (वारजे) या मार्गावरील फीडर बसमध्ये गुरुवारपासून सुरू होत आहे. याबाबत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रतापसिंह यांनी माहिती दिली.
शहरात मेट्रोसह पीएमपी प्रवाशांची संख्या वाढत आहे. मेट्रोला गर्दी वाढत असताना, पीएमपीने समांतर फीडर सेवा सुरू केली. त्यात ऑनलाइन पेमेंट सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. आता “मेट्रो आणि पीएमपीचे तिकीट एकाच कार्डवर मिळावे, अशी सुविधा असावी. त्यासाठी प्रयत्न व्हावा, असे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीच्या कॅशलेस सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी सुचविले. तर “एक कार्ड एक राज्य’, त्यानंतर “एक कार्ड एक देश’ हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर पीएमपीकडून “ट्रायल’ सुरू करण्यात आले आहे.
ट्रायलनंतर पुढील निर्णय
“प्रवास मेट्रोचा असो की पीएमपीचा, कार्ड स्वॅप करा आणि आरामदायी प्रवास करा. पीएमपीकडील मशीन आणि मेट्रोचे कार्ड यातील काही तांत्रिक बाबी वेगळ्या असल्यामुळे दोन्ही विभागाच्या बैठकीतील चर्चेनंतर पीएमपीच्या मशीनमध्ये बदल करण्यात आला. तांत्रिक अडचणीसह अन्य बाबींचा अहवाल तयार करून ही सेवा कशी सुरू होईल, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.