वॉशिंग्टन, ता. 27 – गेल्या काही आठवड्यांत रशियाने हायड्रोजन बॉंबची प्रात्यक्षिके करून पाहिली, या स्वरूपाची जी माहिती प्रकट करण्यात आली होती तीबाबत अटॉमिक एनर्जी कमिशनच्या सभासदांना प्रश्न करता त्यांनी कसलाही अभिप्राय व्यक्त करावयास नकार दिला.
सतरा सप्टेंबर रोजी अटॉमिक शस्त्राची चाचपणी करून पाहिली व ती मोठीच उद्बोधक होती असे खुद्द रशियन सरकारने जाहीर केले होते. त्यानंतर एका जपानी वृत्तपत्रांत रशियाने अलास्काच्या आसपास डायड्रोजन बॉंबचाच प्रयोग करून पाहिल्याचे विश्वसनीय वृत्त आले होते. परंतु उपरोक्त कमिशनने या सर्व प्रकाराबाबत गुप्तता स्वीकारली आहे.
विश्वास ठेवा अगर ठेवू नका
हॅम्बुर्ग – अठ्ठावीस वर्षांचा एक हंगेरियन तरूण एका बंद पार्सल पेटीत बसून येथे आला. या पेटीत त्यास 15 दिवस राहावे लागले. त्याने आठवडाभर काहीच खाल्ले नव्हते. तो पाणीही प्याला नाही. या तरुणाचे नाव कोमोरक्सी असे असून त्याने बुडापेस्टहून पळून जाण्यासाठी हा मार्ग स्वीकारला.
सात दिवसांत पार्सलची पेटी इच्छित स्थळी पोचेल अशा कल्पनेने त्याने शिदोरी घेतली होती व पाण्याच्या बाटल्याही घेतल्या होत्या. ही पेटी रेलगाडीतून येथे आली व आठवडाभर गुदामात पडून राहिली. अन्नपाण्यावाचून व्याकूळ झाल्याने हा इसम आतून किंकाळ्या फोडू लागल्याने पेटी फोडण्यात आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
भारताचे आशादायी यश
मिरज – “”जागतिक शांतता प्रस्थापनेच्या महान कार्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेने मिळविलेले यश असामान्य वा अद्वितीय नसले तरी, अशादायक आहे. या कार्यात स्वतंत्र भारताने संयुक्त राष्ट्रसंघटनेला केलेले सहाय्य अभिनंदनीय व आदरनीय आहे. शांतता प्रसार व प्रचार करणाऱ्याच्याकार्यी, भारताला एक अद्वितीय दर्जा व असामान्य अधिकार प्राप्त झाला आहे. पंडित नेहरूंच्या स्वरूपांत भारत आज जगात शांतिदूताचे कार्य करीत आहे.” असे उद्गार आ. के. गो. पंडित यांनी संयुक्त राष्ट्रदिनानिमित्त येथे खासदार पवारांचे अध्यक्षतेखाली बोलताना काढले.