पुणे: राज्यातील पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नसून रविवारी सायंकाळी पुणे शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नसल्याची परिस्थिती आहे.
पुण्यावर १२ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले असून, खालच्या स्तरात त्यांची घनता जास्त आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत मध्यम ते जास्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
संध्याकाळी 6 च्या सुमारास शहरातील मध्य भागासह उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली आहे. औंध, खडकी, विमाननगर, वडगावशेरी, धानाेरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे.
त्याचबराेबर बिबवेवाडी, काेंढवा परिसरात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पश्चिम उपनगरांमध्ये देखील जाेरदार पाऊस काेसळत आहे. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, काेथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळत आहे.