– सुनील राऊत
पुणे – शहरात करोनाबाधित वाढत असताना दुसऱ्या बाजूला करोनावर मात करत घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत 57; तर गेल्या दीड महिन्यांत 20 जणांना घरी सोडले आहे. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने दहशतीखाली असलेल्या शहराला दिलासा मिळत आहे.
शहरात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत हा आकडा 711 वर पोहोचला असून 55 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच दररोज नवीन 60 ते 70 रुग्णांची भर पडत आहे. मात्र, आता त्याचवेळी बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 17 ते 21 एप्रिलदरम्यान 58 जण घरी सोडले. त्यात 17 आणि 18 एप्रिल रोजी प्रत्येकी 4 तर, 19 एप्रिल रोजी 18 तसेच 20 एप्रिलला 13 आणि 21 एप्रिलला पुन्हा 18 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
विभागात 135 रुग्ण बरे
पुणे विभागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 896 झाली असून 135 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. पुणे जिल्ह्यात 813 बाधित रुग्ण असून 55 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा 16 बाधित असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर 30 बाधित असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली 27 बाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 बाधित आहेत.