नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हैदोस घातला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर आणखी एक इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.
यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस म्हणाले की, ‘अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या महामारीची आताच सुरुवात झाली आहे. ज्या चीनमध्ये या व्हायरसने जन्म घेतला तिथे पुन्हा या व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.’
डब्ल्यूएचओचे टॉप इमरजन्सी एक्सपर्ट डॉ माइक रयान यांनी आंतराष्ट्रीय वाहतूक लगचे सुरू करण्याबाबत इशारा दिला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘असं करणं धोकादायक टरू शकतं.’ तसेच डब्ल्यूएचओने जगभरातील लॉकडाऊन हटवण्याचा विचार करतानाही सावध राहून विचार करण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभरातील अनेक देश लॉकडाऊनमध्ये सूट देत आहेत. काही देशांनी तर लॉकडाऊन हटवला आहे. डब्ल्यूएचओने या देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
यापूर्वी दोन दिवस अगोदरही डब्ल्यूएचओने इशारा दिला होता. ‘यापेक्षाही वाईट काळ आता येणार आहे.’ परंतु डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी त्यांना असं का वाटतं, यासंदर्भात कोणतंही भाष्य केलं नव्हतं. ते असेही म्हणाले होते की, डब्ल्यूएचओ आधीपासूनच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत जागरूक करत आहे.