पुणे -अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींपासून करोना संसर्ग वेगाने वाढण्याची भिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक गावात अशा “सुपर स्पेडर’चे सर्वेक्षण करीत आहे. त्यात 20 दिवसात 516 करोनाबाधित सापडले.
जिल्ह्यामध्ये सध्या शिरूर, हवेली, जुन्नर, खेड, बारामती, मावळ या तालुक्यांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. महिन्यात ग्रामीण आणि नगरपरिषद हद्दीत तब्बल 1300 पेक्षा अधिक बाधित सापडले. अवघ्या 20 दिवसांत (आठ मार्चपर्यंत) 73 हजार 312 जणांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये तीन हजार 572 जणांमध्ये लक्षणे आढळली. नमुने तपासणी केली. त्यामध्ये 516 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
सुपर स्पेडर सर्वेक्षणामध्ये नमुने तपासणीच्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाण 12 टक्के आहे.
हे प्रमाण कमी असले तरी, या व्यक्तींच्या संपर्कात दररोज शेकडो व्यक्ती येतात. त्यामुळे यांचे निदान तात्काळ झाल्यामुळे पुढील धोका टळू शकतो. त्यानंतर बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांचीही नमुने तपासणी केली जात आहे.