आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; 2515 योजनेतून मिळाली मंजुरी
सातारा – सातारा तालुक्यातील सातारा शहरानजीकच्या मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या कोंडवे आणि सैदापूर या दोन गावांतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, बंदिस्त गटर करणे तसेच कारी व आष्टे येथे सभामंडप बांधकाम करणे अशा एकूण पाच विकासकामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 5 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.
राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515/1238) या योजनेतून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा तालुक्यातील कोंडवे आणि सैदापूर या सातारा शहरानजीकच्या दोन मोठ्या ग्रामपंचायती असून या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत शहरालगत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
याठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतींचा निधी कमी पडत असतो. त्यामुळे अशा लोकवस्ती वाढलेल्या भागामध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कोंडवे-दिव्यनगरी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 2 कोटी आणि कोंडवे गावांतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटर करणेसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या सैदापूर गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण करणे आणि बंदिस्त गटर करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, कारी येथे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख आणि आष्टे येथे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कामे त्वरित सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केल्या आहेत.