आम्ही शंख केला; पण धूम्रपानी ऐकत नाहीत!
न्यूयॉर्क, ता. 28 – सिगारेट ओढू नका म्हणून आम्ही जगभर शंख केला तरी सिगारेट शौकीन आमचे ऐकत नाहीत, अशी निराशाजनक भाषा कॅन्सर रोगांवरील तज्ज्ञांनी काढली आहे. ते म्हणतात, अमेरिकेत 1967 ते 71 पर्यंत धूम्रपान करणाऱ्यांची संख्या घटली होती.
परंतु आता तो आकडा वाढू लागल्याचे दृष्टिपत्तीस आले आहे. इतर देशांनाही हा प्रश्न भेडसावीत आहेच. अमेरिकन कॅन्सर सोसायटी धूम्रपान विरोधी जागतिक परिषद 1975 साली न्यूयॉर्क येथे होणार आहे.
युरोपात अमेरिकन सैन्य हवेच
शिकागो – पश्चिम जर्मनीचे चान्सलर विली ब्रांडट् यांनी असे मत प्रदर्शित केले की, युद्धाच्या पावित्र्यात असलेले अमेरिकन सैन्य परदेशात असल्यामुळे जागतिक सुरक्षितता कायम राहू शकते. त्यांच्या अस्तित्वामुळे पूर्व व पश्चिम यांचे दरम्यान लष्करी समतोल राहू शकतो.
जगात वाघांची संख्या अतिशय रोडावली
जीनिव्हा- सबंध जगात वाघांची संख्या अतिशय घटली आहे. याचे कारण त्यांची शिकार फार मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. शिवाय त्यांची नैसर्गिक वसतिस्थानेही फार मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहेत, असे हिंस्रश्वापद संरक्षण निधी समितीतर्फे जाहीर केले आहे.
70 वर्षांपूर्वी जगात 1 लाखावर वाघ होते ते आता फक्त 5000 च उरले आहेत. भारत, बांगलादेश, नेपाळ व इंडोनेशियांत मिळून फक्त 2000 वाघ आहेत, असेही जाहीर करण्यात आले आहे.
पुण्याचे पाणी दूषित नाही
पुणे – पुणेकर नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा दूषित पाण्याचा मुळीच नाही आणि घाबरण्याचे काहीही कारण नाही, अशी माहिती पाणीपुरवठा प्रमुख मराठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, तासाला पाण्याचा नमुना तपासला जातो व किमान 10 ठिकाणचे नमुने तपासले जातात.