वार्षिक सभा खेळीमेळीत
सातारा – आधुनिक यंत्रसामग्री, चांगला कापूस, यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती, उत्पादनाची विविध स्तरावरील चाचणी यामुळे अजिंक्यस्पिन सूताचा दर्जा चांगला आहे. जागतिक मंदी आणि करोनामुळे लॉकडाऊनच्या कठीण काळातही अजिंक्यतारा सूतगिरणीचा प्रगतीचा आलेख उंचावला असून, इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
वळसे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीची 31 वी वार्षिक सभा करोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने उत्साहात झाली. चेअरमन उत्तमराव नावडकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
व्हाइस चेअरमन बापूराव महाडिक, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक अनंता वाघमारे, नितीन पाटील, माजी व्हाइस चेअरमन दिलीप निंबाळकर, अजिंक्यतारा ऊसतोडणी व वाहतूक संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण फडतरे, सूतगिरणीचे संचालक जगन्नाथ किर्दत, बळीराम देशमुख, आबासाहेब साबळे, अशोक कदम, अशोक काठाळे, सुनील देशमुख, भगवान शेडगे, रघुनाथ जाधव, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, गणपतराव मोहिते, माजी चेअरमन विष्णू सावंत, माजी संचालक भानुदास मोहिते, अजिंक्यारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रॉडक्शन मॅनेजर रमेश नीळकंठ, मिल इंजिनिअर प्रदीप राणे, एचआर मॅनेजर राजेश दीक्षित, उपस्थित होते. अजिंक्यतारा सूतगिरणीच्या सूतास स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. संस्थेने या वर्षात मोठ्या प्रमाणात निर्यातीचे धोरण आखले आहे. सूतगिरणीत उच्च प्रतीचे सूटिंग, फर्निश्ड फॅब्रिक, कार्डेड कॉम्पॅक्ट, कोम्बड्, स्लब या प्रकारच्या सूताची निर्मिती केली जात आहे.
उत्कृष्ट मार्केटिंग तंत्र, व्यावसायिक व्यवस्थापन, खर्चात काटकसर यामुळे ही प्रगती साध्य करता आली. पुढील काळात 25 हजार 200 चात्यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपणा सर्वांची साथ कायम रहावी, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेंनी सभासदांना केले. प्रारंभी दिवंगत आ. अभसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी श्रद्धांजली ठरावाचे, चीफ अकौंटंट मानसिंग पवार यांनी विषयांचे वाचन केले. संचालक अजित साळुंखे यांनी आभार मानले.