पुणे – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणे शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलीस विभाग आणि महापालिका यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लावलेले सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम याचे उत्तम उदाहरण आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीचे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी व्यक्त केली.
महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विकासनिधीतून समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवले असून अद्यावत कंट्रोल रूम उभारली आहे. याचे उद्घाटन पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे आदी उपस्थित होते. गृह विभागामार्फत संपूर्ण शहरात एक हजारापेक्षा अधिक कॅमेरे बसवले असून अजून 1400 बसविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले प्रकल्प करताना निधीची अडचण येते.
महापालिकेने यासाठी निधी दिल्यास नागरिकांच्या हिताचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील. पुणे पोलिसांनी ई-व्हेईकलसाठीचा प्रस्ताव महापालिकेला दिला असून पुढील काही दिवसांमध्ये हा प्रकल्पदेखील कार्यान्वित होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी व्यक्त केली.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत पोलिसांना देण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपये तसेच पोलीस वसाहती सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार कांबळे यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविणे किती आवश्यक आहे, हे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर तातडीने यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.