शेख अब्दुल्लांना जनता पक्षात येण्याचे आवाहन
जम्मू, दि. 24 – मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी “नॅशनल कॉन्फरन्स’सह जनता पक्षात सामील व्हावे, असे आवाहन भारतीय लोकदलाने केले आहे. जनता पक्ष जम्मूमध्ये दोन व काश्मीरमध्ये एक अशा एकूण तीन जागा राज्यात लढवणार आहे. राज्यासाठी लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत.
वसंत पंचमीनिमित्त प्रयागला स्नान
कुंभनगर – वसंत पंचमीनिमित्त येथील त्रिवेणी संगमात हजारो भाविकांनी पहाटे साडेतीन वाजल्यापासून स्नानांना सुरुवात केली. महानिर्वाण पथाचे स्वामी कृष्णानंद हे चांदीच्या रथातून स्नानास आले.
ऱ्होडेशियन सरकारने ब्रिटिश योजना फेटाळली
सॅलिस्बरी – ऱ्होडेशियात कृष्णवर्णीयांची सत्ता आणण्याबाबतची ब्रिटनची नवी योजना इयान स्मिथ यांच्या सरकारने पूर्णतः फेटाळून लावली आहे. ही योजना जीनिव्हा परिषदेसाठी पायाभूत ठरविण्यास स्मिथ सरकारने नकार दिला आहे. राजकीय कैद्यांची सुटका व्हावी म्हणून येथे हिंसक निदर्शने चालू आहेत.
क्विलिस यांना पळवून नेणारे लोक डाव्या “अतिरेक्यां’पैकी असावेत, असे सांगण्यात आले. याच गटातील लोकांनी सहा आठवड्यांपूर्वी देशाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अँटोनिओ मारिया द ओरिऑल यांना पळवून नेले होते.