भारतीय शिक्षकांसाठी ब्रिटीश प्रशिक्षण तंत्र
लंडन, दि. 22 – वायव्य इंग्लंडमधील लॅनकॅस्टर विद्यापीठातील मायक्रोटीचिंग यूनिटने शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या एका नव्या धर्तीच्या अभ्यासक्रमाची भारतात सुरुवात करण्यात येणार आहे. मलेशियातही तो सुरू केला जाईल यासाठी लिव्हरह्यूम ट्रस्टने 16000 पौंडाचे (सुमारे 3 लक्ष रुपये) अनुदान या यूनिटला नुकतेच दिले.
भारतात हा अभ्यासक्रम बडोदा विद्यापीठात सुरू होईल. या अभ्यासक्रमामुळे मुलांना प्रश्न विचारण्याचे शिक्षकांचे कौशल्य वाढते. शिक्षकाला आपले अध्यापन कसे काय चालते ते मार्यादित मंडल दूरचित्रवाणीवर पाहता येते. हे तंत्र ब्रिटनमध्ये चांगले यशस्वी ठरले आहे.
देशी क्षेपणास्त्राची चाचणी
विशाखापट्टम – भारतीय नाविक दलाने तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे नाविक दलाचे चिफ ऍडमिरल एस. एन. कोहली यांनी सांगितले. आधुनिक पाणबुड्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहून नाविक दलाची त्यानुसार उभारणी करण्याची जरुरी आहे. पाणबुडीविरोधी विमाने नाविक दल प्राप्त करीत आहे. बॉम्बे हाय व इतर भागात क्रूड तेल मिळू लागले आहे. त्यामुळे नाविक दलावरील जबाबदारीही वाढली आहे.
भीमाशंकर घाटाचे काम
पुणे – मुंबई-अहमदनगर रस्त्याच्या कामातील महत्त्वाच्या टप्प्याचे- भीमाशंकर घाटाचे काम पुढील वर्षी सुरू होईल. या रस्त्यामुळे मुंबईचे अंतर वीस मैलाने कमी होईल.