SSC Result 2024 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळविले आहेत. मात्र, पुण्यातील एका विद्यार्थ्याने उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले किमान ३५ गुण सर्वच विषयात मिळविले आहे. ३५ टक्के गुण मिळविणारा विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश तूपसुंदर असून, तो टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे.
दहावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात न्यू इंग्लिश स्कूलचा प्रथमेश तूपसुंदर याला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. प्रथमेशने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवले आहेत. ३५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. एकीकडे शंभर टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. याउलट ३५ टक्के गुण घेतलेला विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्याचा दहावीचा 95.81 टक्के निकाल –
राज्याचा निकाल 95.81 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 1.98 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनालाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते.
– मुलींचा निकाल – 97.21 टक्के
– मुलांचा निकाल – 94.56 टक्के
– मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे.
राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल –
-पुणे – 96.44
-नागपुर – 94.73
-संभाजीनगर – 95.19
-मुंबई – 95.83
-कोल्हापूर – 97.45
-अमरावती – 95.58
-नाशिक – 95.28
-लातूर – 95.27
-कोकण – 99.01