Devendra Fadnavis on Sanjay Raut | Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी (दि. २६) ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले होते. या लेखात भाजप पक्षातील अंतर्गत वादाबाबत सांगण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले, असा गंभीर दावा केला. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे.
त्यांनी या लेखात उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे. अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले. सामनामध्ये 4 जूननंतरची मोक्षप्राप्ती! या शीर्षकाखाली हा गंभीर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, आता संजय राऊतांच्या या दाव्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका. ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत. तिथे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी उपचार घ्यावा, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी चढवला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते बसवून ठरवतील.
भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते.