आंतरराष्ट्रीय स्थिती गुंतागुंतीची असली तरी शांततेकडे वाटचाल
वॉर्सा, दि. 16 – आंतरराष्ट्रीय परिस्थिती सध्या अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. शांततेशी विसंगत अशा घटना जागोजाग घडताना दिसतात. तरीही तणाव दूर होण्याची व शांततेप्रत जाण्याची प्रवृत्तीच प्रबळ आहे. काही महिन्यांपूर्वी भरलेल्या हेलसिंकी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निर्णयामुळे शांततेचा मार्ग निर्वेध झाला आहे, हे ठामपणे सांगता येते, असे उद्गार सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ब्रझनेव्ह यांनी येथे काढले.
पोलंडच्या संयुक्त कामगार पक्षाच्या 7 व्या अधिवेशनात ते भाषण करीत होते. संमत झालेल्या अपाययोजना एकत्रितपणे अमलात आणल्या पाहिजेत.
ग्राहकोपयोगी जिनसांचे सहकारी क्षेत्रात उत्पादन
नवी दिल्ली – ग्राहकोपयोगी जिनसांचे सहकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची केंद्रीय नागरी पुरवठा व सहकार खात्याची योजना आहे. मध्यम व कमी उत्पन्न गटातील लोकांचा फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. या जिनसांत पाव, सुती व लोकरी कपडे, साबण, इलेक्ट्रिक बल्ब्ज, टूथपेस्ट इत्यादींचा समावेश आहे.
ग्राहक सहकारी संस्था या जिनसाच्या उत्पादनात 3 प्रकारांनी भाग घेतील- 1) सार्वजनिक वा खासगी क्षेत्रातील उद्योगात सहभाग 2) नियंत्रित अशा उद्योगांची उभारणी 3) ग्राहकांना वस्तू कमी भावात मिळण्यासाठी उत्पादकांकडून ठोक स्वरूपाची खरेदी. या योजनेचा गरीब लोकांना मोठा फायदा होणार आहे.