विवाहाचे वय 21 व 18 ठरविणार
नवी दिल्ली, दि. 17 – कुटुंबकल्याण कार्यक्रमास गती येण्यासाठी सरकारने विवाहाचे वय पुरुषासाठी 21 व स्त्रीसाठी 18 असावे असे ठरविले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री राजनारायण यांनी सांगितले.
विवाहयोग्य वयाच्या सूचनेला केंद्र मंत्रिमंडळाची संमती मिळाली असून लवकरच त्याबाबत कायदा करण्यात येईल. कुटुंब नियोजनसाठी सक्ती नको तर, खुशीने कुटुंब नियोजन व्हावे.
इंग्रजी भाषेला दारे बंद करणे योग्य होणार नाही
नवी दिल्ली – विजयालक्ष्मी पंडित म्हणाल्या, की इंग्रजी भाषेला आपण दारे बंद करणे शहाणपणाचे ठरणार नाही. कारण भारत हा फार मोठा देश आहे व आपल्याला एकमेकांपासून खूप शिकावयाचे आहे.
इंग्रजीतून शिक्षण झाले तरीही मी भारतीय आहे व मला त्याबद्दल अभिमान वाटतो. तसेच हल्ली फक्त राजकीय बातम्या प्रसिद्ध होतात. वास्तविक सांस्कृतिक, नैतिक प्रश्नही विचारात घेतले पाहिजे.