– हिमांशू
घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच. कुरबुरी नसलेली घरं एकतर बघायला मिळणार नाहीत आणि मिळालीच तरी ती खूप मिळमिळीत वाटतील. एकमेकांच्या विचारांची, मतांची, हितांची टक्कर कधी ना कधी होणार आणि खटके उडणार. पती-पत्नीचं एक नातं सोडलं तर बाकीची सगळी नाती आपल्याला आयती मिळालेली असतात. त्याही नात्यांमध्ये कुरबुरी चालतातच; पण पती-पत्नींमधलं नातं दोघांनीच तयार केलेलं असल्यामुळे कुरबुरींची जबाबदारी दोघांनाही घ्यावी लागते आणि कुणालातरी मागच्या पावलावर यावं लागतं.
तुटेपर्यंत ताणता येत नाही. रागाच्या भरात एकमेकांना उद्देशून अद्वातद्वा बोललं गेलं, तर मागाहून खंत व्यक्त करावी लागते. राजकीय नेत्यांप्रमाणं रेटून नेता येत नाही. हल्ली चोवीस तास आपल्याला टीव्हीवर राजकीय चिखलफेकच दिसत असली, तरी मनोरंजनाचं साधन समजून ती सोडून दिलेलीच बरी. ती जास्त मनावर घेतली तर आपलीही मानसिकता तिखट होते. राजकारण्यांनी एकमेकांविरुद्ध मानहानीचे आणि अब्रूनुकसानीचे खटले भरले, तरी त्यांना मिळतो तो “टीआरपी’ आणि आपल्याला मिळते ती “बदनामी’!
म्हणूनच कोणत्या गोष्टीवरून किती भांडायचं आणि जिभेला किती सैल सोडायचं, हे ठरवूनच वादविवाद केलेले बरे! यासंदर्भात काही ताजी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. उदाहरणार्थ, “वेडी आहेस का,’ असं प्रियकराने म्हटलं तर प्रेयसी सुखावते; पण पतीने म्हटलं तर पत्नी मोठा इश्यू करते, कारण एकाच वाक्याचा “टोन’ वेगळा असू शकतो. असाच एक इश्यू मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला आणि पत्नीला पतीचा “टोन’ सिद्ध करता आला नाही.
“तुला अक्कल नाही,’ हे वाक्य अपमानजनक पद्धतीनं उच्चारलं गेलंय की नाही, याचा संदर्भ मिळाल्याखेरीज त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असं मत कोर्टाने नोंदवलं. हे वाक्य मराठी माणूस कोणत्याही स्तरावर उच्चारतो. त्यामुळे त्यामागे अपमान करण्याचा हेतू होता, हे सिद्ध होईपर्यंत संबंधिताचा मानसिक छळ झाला असं म्हणता येणार नाही, असं कोर्टाने सांगितलं. शिवाय, निराधार आरोपामुळे पतीला वेदनादायक परिस्थितीतून जावं लागलं हे मान्य करून कोर्टाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
तात्पर्य, सामान्य माणसाच्या छोट्या गोष्टी कितीही मोठ्या झाल्या, तरी त्यातून काहीच सकारात्मक निष्पन्न होत नाही. असं असताना एखाद्या पतीने साध्या लिपस्टिकचा मोठा इश्यू केला, तर त्याच्या पदरात काय पडणार? प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या ताजमहालाच्या सावलीतला, म्हणजे आग्रा शहरातला हा पती पादत्राणांच्या कारखान्यात काम करतो. रात्री तो कामावरून परतल्यावर नेहमीप्रमाणं त्याच्या पत्नीने लिपस्टिक लावलं. सकाळी लिपस्टिक दिसलं नाही म्हणून पती भडकला. एवढ्या कारणावरून दोघांत जुंपलेलं भांडण पोलीस स्टेशनात गेलं.
“सकाळी ब्रश केल्यावर लिपस्टिक कसं दिसणार,’ या पत्नीच्या प्रश्नानं पोलिसांनाही लाजल्यासारखं झालं. अखेर दोघांनाही समुपदेशकांच्या ताब्यात देऊन पोलिसांनी अंग काढून घेतलं. कानपूरमधल्या अशाच एका प्रकरणाचा अंत मात्र भयानक झाला. 17 वर्षांच्या संसारानंतर मित्रांना जेवायला बोलावण्याच्या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत भांडण झालं. पत्नीनं पोलिसांना घरी आणलं आणि ते पाहून बदनामीच्या भीतीनं पतीने थेट आत्महत्याच केली. अशा घटना नात्यांची जन्मकथाच नव्यानं मांडण्याची गरज अधोरेखित करतात. नाती म्हणजे युत्या-आघाड्या आहेत का?