लंडन – करोना विषाणू महासाथ अवघ्या जगासाठी धोकादायक ठरली आहे. गतवर्षीपासून संपूर्ण जग या संकटाचा सामना करत असून अद्यापतरी परिस्थिती नजीकच्या काळात पूर्णपणे आटोक्यात येईल असं दिसत नाही.
दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग बहुतांश रुग्णांमध्ये रौद्ररूप धारण करत नसला तरी काही रुग्णामध्ये मात्र त्याचे गंभीर परिणाम दिसून येतायेत. करोनाचा असाच गंभीर संसर्ग ब्रिटनमधील ब्रिस्टोल येथील एका ७२ वर्षीय आजोबांना झाला आहे.
डेव्ह स्मिथ असे या वयोवृद्धाचे नाव असून त्यांचा करोना अहवाल एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १० महिन्यांपासून पॉझिटिव्ह येतोय. स्मिथ हे निवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहेत. त्यांची करोना चाचणी आतापर्यंत तब्बल ४३ वेळा पॉझिटिव्ह आलीये. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ७ वेळा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलंय. एवढंच काय तर नातेवाईकांनी त्यांच्या अंतिम संस्काराचीही तयारी केली होती.
याबाबत माहिती देताना, स्मिथ यांच्या पत्नी लिंडा सांगतात, आमच्यासाठी संपूर्ण वर्षच अत्यंत कठीण होत. काही वेळा तर असं वाटायचं की ते आता वाचू शकणार नाहीत.
याबाबत ब्रिस्टल विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे सल्लागार एड मोरान यांनी, “त्यांच्या शरीरामध्ये हा विषाणू पूर्ण काळ सक्रिय होता. त्यांच्या शरीरातील विषाणू विद्यापीठात चाचणीसाठी पाठवल्यानंतर आम्ही हे सिद्ध करू शकलो. तो सक्रिय व दीर्घकाळ टिकून राहिलेला विषाणू होता ज्यामुळे पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येत होती.” अशी माहिती दिली.
स्मिथ यांना अमेरिकेतील रिजेनेरॉन या बायोटेक कंपनीने तयार केलेले सिंथेटिक अँटीबॉडीजचे कॉकटेल दिल्यानंतर ते आता करोनामुक्त झाले आहेत. या उपचार पद्धतीला ब्रिटनमध्ये अद्याप मान्यता नसली तरी स्मिथ यांची प्रकरणात त्याला परवानगी देण्यात आली.
दरम्यान, करोनातून मुक्त झाल्यानंतर आपण व आपल्या पत्नीने शॅम्पेनचा आस्वाद घेऊन हा आनंदाचा क्षण साजरा केल्याचं स्मिथ सांगतात. मात्र हा खास क्षण त्यांना सिंथेटिक अँटीबॉडीजचे कॉकटेल घेतल्यानंतर ४५ दिवस व पहिल्यांदा बाधा झाल्याच्या ३०५ दिवसांनंतर अनुभवण्यास मिळालं हे देखील ते आवर्जून सांगतात.