साउदम्पटन – कर्णधार केन विल्यमसनचे नाबाद अर्धशतक व रॉस टेलर याच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव करताना आयसीसीच्या पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पावसामुळे सातत्याने व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहणार असे वाटत असतानाच न्यूझीलंडने गोलंदाजीसह फलंदाजीतही वर्चस्व राखताना भारतीय संघाला पराभूत केले. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हाराकिरी केली.
विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने 2 गडी गमावून 46 व्या षटकात पार केले. सलामीवीर टॉम लॅथम व नवोदित डेव्हन कॉनवे लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार विल्यमसन व टेलर यांनी अखेरपर्यंत नाबाद राहात संघाचे विजेतेपद साकार केला. विल्यमसनने नाबाद 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 52 तर, टेलरने 6 चौकारांसह नावाद 47 धावांची खेळी केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अखंडित 96 धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा डाव 170 धावांवर संपला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावा करण्याचे सोपे लक्ष्य होते. त्यापूर्वी बुधवारी भारताने आपल्या 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर उरलेले आठ फलंदाज केवळ 106 धावांची भर घालून तंबूत परतले.
न्यूझीलंडच्या टीम साउदी, ट्रेन्ट बोल्ट व काएल जेमिसन यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त केली. या सामन्यात पहिल्या व चौथ्या दिवसाचा खेळ संततधार पावसाने वाया गेला होता.
मात्र, आयसीसीने सहावा राखीव दिवस ठेवल्यामुळे तसेच पावसाने ओढ दिल्यामुळे बुधवारी खेळ वेळेवर सुरू झाला. स्वच्छ सूर्यप्रकाशात भारतीय फलंदाजी यशस्वी होईल असे चित्र दिसत होते. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेली अचूक गोलंदाजी व भारतीय फलंदाजांनी केलेली बेजबाबदार फलंदाजी हेच समीकरण पुन्हा एकदा दिसले.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 217 धावा. न्यूझीलंड पहिला डाव – 249 धावा. भारत दुसरा डाव – 73 षटकांत सर्वबाद 170 धावा. (ऋषभ पंत 41, रोहित शर्मा 30, रवीचंद्रन अश्विन 16, चेतेश्वर पुजारा 15, अजिंक्य रहाणे 15, विराट कोहली 13, रवींद्र जडेजा 13, टीम साउदी 4-48, ट्रेन्ट बोल्ट 3-39, काएल जेमिसन 2-30, नील वॅगनर 1-44). न्यूझीलंड दुसरा डाव – 45.5 षटकांत 2 बाद 140 धावा. (केन विल्यमसन नाबाद 52, रॉस टेलर नाबाद 47, रवीचंद्रन अश्विन 2-17).