कोची – केरळमधील भारतीय जनता पार्टीचे ओबीसींचे नेते रणजीत श्रीनिवासन यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोठावल्यानंतर मावेलिक्काराचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सोशल मीडियासह विविध प्रकारांनी धमकावले जात असून पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.
आरोपींना शिक्षा जाहीर केल्यानंतर न्या. श्रीदेवी यांना धमक्या देण्याचे सत्र सुरू झाले होते. त्यामुळे पोलिसांनी बुधवारीच त्यांची सुरक्षा वाढवली होती. चार जणांना त्याच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली आहे. अलाप्पुझाचे पोलीस प्रमुखांनी यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की धमकीच्या संदर्भात पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून चार प्रकरणांत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये रणजीत श्रीनिवासन यांची हत्या झाली होती. त्याप्रकरणात न्यायालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित १५ जणांना मंगळवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगेचच न्यायाधीशांना उद्देशून अपशब्द सोशल मीडियावर येण्यास सुरूवात झाली होती. सर्वच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देणे पूर्णत: न्यायोचित आहे असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले होते. १९ डिसेंबर २०२१ रोजी श्रीनिवासन यांची त्यांच्या कुटुंबीयांसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.