रांची – झारखंड मुक्ती मोर्चा विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. येथील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या आधीचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड होऊनही राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यास विलंब केल्याने राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आज अखेर चंपाई सोरेन यांना शपथ देण्यात आली.
चंपाई सोरेन यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम आणि आरजेडी नेते सत्यानंद भोक्ता यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आणि यावेळी झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
६७ वर्षीय आदिवासी नेते चंपाई सोरेन हे राज्याचे १२ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. झारखंडच्या कोल्हान प्रदेशातील ते सहावे मुख्यमंत्री आहेत.
चंपाई सोरेन यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, असे राज्य काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनी सांगितले. त्यांचा पक्ष सत्तारूढ आघाडीचा घटक आहे. आम्ही एकजुटीने उभे आहोत. आमची युती खूप मजबूत आहे. ती कोणीही तोडू शकत नाही, असे चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जी विकास कामे सुरू आहेत ती आपण वेगाने मार्गी लावू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सत्तारूढ आघाडीच्या आमदारांना हलवले तेलंगणात
राज्यातील नव्या सरकारला दहा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने त्या अवधीत आमदारांची भाजपकडून फोडाफोडी होऊ शकते हे लक्षात घेऊन राज्यातील सत्तारूढ आमदारांना दोन विशेष विमानांनी तेलंगणातील हैदराबाद येथे नेण्यात आले आहे. तेलंगणात कॉंग्रेसचे सरकार असल्याने तेथे आमदार सुरक्षित राहतील असे आघाडीच्या नेत्यांना वाटते आहे.
दरम्यान या प्रकरणात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जी अटक झाली आहे त्याच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण त्यांना तेथे काहीही दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करणार नाही तुम्ही हायकोर्टात जा असे त्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.