Women’s Candidates | Lok Sabha Election 2024 – लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारे विधेयक याच वर्षाच्या सुरुवातीला मंजूर झाले आहे. या विधेयकाचे श्रेय घेणाऱ्या सर्वच पक्षांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत किती महिलांना प्रतिनिधीत्व दिले, हा आकडा सर्वच राजकीय पक्षांना शरमेने मान खाली घालायला लावणार आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्यापैकी केवळ १४ जागावंर महिला उमेदवार आहेत.
यंदा राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार असून महायुती आणि मविआतील जागा वाटपाचा घोळ संपलेला नाही. दरम्यान, आतापर्यत जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरुनच पुरोगामी महाराष्ट्राला, महिला शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला खचितच अभिमानास्पद नाही. । Women’s Candidates | Lok Sabha Election 2024
राज्यातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी पाव तुकडा तेवढा महिला राजकारण्यांच्या वाट्याला आला आहे. 48 पैकी 15 जागांवर महिलांना प्रमुख चार राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. त्यातही काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केल्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या 14 वर आली.
सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा लढवणाऱ्या भाजपने जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपने सहा महिलांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये नंदूरबारमधून खासदार डॉ. हिना गावित, जळगावमध्ये स्मिता वाघ, रावेरमधून खासदार रक्षा खडसे, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आणि नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या महिलांना तिकीट दिले आहे. । Women’s Candidates | Lok Sabha Election 2024
तसेच बीडमधून प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्या भगीनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने सहा महिलांना उमेदवारी दिली आहे. यातील चार जणी 2019 मध्येही खासदार होत्या, दोन नवीन महिला उमेदवार सत्ताधारी भाजपने दिले आहेत.
भाजपसोबत गेलेल्या शिंदेच्या शिवसेनेने एका महिला खासदाराचे तिकीट कापले आणि दुसऱ्या महिलेला दिले आहे.
यवतमाळ-वाशिम येथून पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांचे तिकट कापले आहे. तिथे राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ पाटील यांचे माहेर आहे.भाजपसोबत गेला दुसरा फुटीर पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी महायुतीत बऱ्यापैकी जागा राखल्या आहेत.
अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून तर धाराशिव मतदारसंघात अर्चना पाटील यांना भाजपमधून आयात करुन उमेदवारी दिली आहे. दादांच्या पक्षाने या दोन महिलांना तिकीट दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार महिला धोरणाचा गाजावाजा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्षांच्या कन्येशिवाय इतर एकाही जागेवर महिलेला प्रतिनिधीत्व दिलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाडून खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या लोकसभा गाजवणाऱ्या खासदार आहेत. त्यांना संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पुरोगामीत्वाचा बडेजाव करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकाधिक महिला कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पालघरमध्ये भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. तर कल्याणमध्ये मोठी खेळी करत एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंविरोधात एकनिष्ठ शिवसैनिक वैशाली दरेकर – राणे यांना मैदानात उतरवले आहे. ठाकरेंच्या दोन्ही महिला उमेदवार या त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामामुळे परिचित आहेत.
सर्वाधिक जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला अजुनही महिलांमध्ये आपले संघटन वाढवता आले नसल्याचे त्यांच्या एकल उमेदवार संख्येवरुन जाणवते. महाविकास आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन महिलांना त्यांनी उमेदवारी दिली होती. त्यात एक सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे तर रामटेकमध्ये रश्मी बर्वे.
त्यापैकी रश्मी बर्वेंचा अर्ज जात प्रमाणपत्रामुळे निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता एकमेव प्रणिती शिंदे याच महिला उमेदवार आहेत. 48 मतदारसंघापैकी प्रमुख राजकीय पक्षांनी फक्त 14 महिलांना उमेदवारी दिली आहे. महिलांना समान हक्क दिले पाहिजे असे सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते बोलत असतात. मात्र राजकारणात हे चित्र अजुनही समाधानकारक म्हणावे तसे नाही. याचा सर्वच राजकीय नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. । Women’s Candidates | Lok Sabha Election 2024