“निजामुद्दीन’मध्ये जिल्ह्यातील 34 जणांचा सहभाग

नगर – नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील 34 जणांनी सहभाग घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 29 जण परदेशी नागरिक आहेत. या नागरिकांपैकी 14 जणांचा स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून, दोघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 437 जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यातील 308 जणांचे स्त्राव निगेटिव्ह, तर 8 जणांचे स्त्राव पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 112 जणांचे स्त्राव तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. या परदेशी व्यक्तींना संगमनेर, राहुरी, जामखेड आणि नेवासा येथून ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची व्यवस्था, अजून तपासणीसाठी व्यक्तीची संख्या वाढली, तर करावयाची उपाययोजना आदींबाबत त्यांची चर्चा केली. तसेच, याठिकाणी पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. बापूसाहेब गाढे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती.

सध्या जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या परदेशी व्यक्ती या इंडोनेशिया, घाणा, फ्रान्स, टांझानिया, आयव्हरी कोस्ट, जिबुटी, बुरुंडी, दक्षिण आफ्रिका या देशांतील असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक नागरिकांची माहिती घेऊन त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत आहे. सध्या ज्या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची पाहणीही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली.

तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यासाठीची व्यवस्था आणखी कोठे करता येईल, याची पाहणी त्यांनी केली. ज्या तालुक्‍यातील व्यक्ती असतील त्यांना तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी क्वारंटाईन करता येईल का, अशी व्यवस्था तिथे आहे का, याबाबतही माहिती त्यांनी घेतली. सध्या 112 जणांच्या स्त्राव नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी असून, आज दुपारपर्यंत आणखी सात व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

रस्तावर फिरणाऱ्या दीड हजारांवर कारवाई
करोना या साथरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. जिल्ह्यात विनाकारण बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणाऱ्या सुमारे 1 हजार 400 जणांवर कारवाई करण्यात आली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर शहरात 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यात 29 परदेशी नागरिकांवरोधात नेवासा, जामखेड, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

रस्तावर फिरणाऱ्या दीड हजारांवर कारवाई
करोना या साथरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. जिल्ह्यात विनाकारण बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणाऱ्या सुमारे 1 हजार 400 जणांवर कारवाई करण्यात आली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर शहरात 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यात 29 परदेशी नागरिकांवरोधात नेवासा, जामखेड, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.