पुणे – करोना विषाणूबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशास्त्रीय संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. अशाचप्रकारे वृत्तपत्रांबाबतही गैरसमज पसरविणारे संदेश पसरविण्यात येत आहेत. त्यात कुठलेही तथ्य नसून जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्यतज्ज्ञांनी सुद्धा याचे खंडन केले आहे.
अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याप्रमाणे वृत्तपत्रांच्या वितरणालाही केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे वाचकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत वृत्तपत्रांचे वितरण 1 एप्रिलपासून सुरू झाले आहे. वितरण सुरू झाले असले तरी नागरिकांमध्ये असणाऱ्या गैरसमजामूळे वितरणामध्ये अडचणी येत आहेत. पुणे शहर व उपनगरांतील काही गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव केला आहे, पण अशा खोट्या संदेशाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या परिपत्रकातही मुद्रित प्रसारमाध्यमांना आणि वृत्तपत्र वितरण साखळीला (वितरक, विक्रेते) अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे वृत्तपत्रे ही समाजाची गरज असून, ती कोणत्याही आडकाठीविना वितरित केली जातील, हे सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे अधोरेखित होते. वृत्तपत्राच्या कागदाद्वारे करोना पसरण्याची कोणतीही शक्यता नसून वृत्तपत्राचा कागद अत्यंत सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.