पवनानगर – मावळ परिसरात अनेक पर्यटक राज्य व परराज्यांमधून पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर मावळातील 31 पर्यटन स्थळे वर्षाविहारासाठी बंद ठेवले आहेत, अशी माहिती प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.
करोनामुळे यावर्षी पर्यटकांना पावसाचा आनंद घेण्यासाठी येता येणार नाही. जर नियामांचे उल्लंघन करत पर्यटक पर्यटनासाठी आले तर त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहरातील भुशी डॅम, वलवन डॅम, पवना धरण, शिरोता डॅम, वडीवळे डॅम, आंद्रा डॅम आदींसह ऐतिहासिक किल्ले, प्राचीन लेण्या आदी ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार मावळातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाकडून मावळातील पर्यटन स्थळांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. बऱ्याच पर्यटकांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.
बंद ठेवण्यात आलेली ठिकाणे…
टाकवे बु, फळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, वहानगाव, कुसवली, बोरवली, डाहुली, सावळा, कुसुर, निळशी, खांडी, राजमाची किल्ला, फणसराई, उधेवाडी, जांभवली, भुशीधरण व परिसर, पवनाधरण व परिसर, तुंगर्ली धरण व परिसर, राजमाची, मंक्की पॉंइट खंडाळा, घुबड तलाव, ड्युक्स नोज, कुरवंडे, घोडेश्वर डोंगर, एकवीरा मंदिर वेहरगाव, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोणा हे किल्ले, आंबेगाव येथील धबधबा, दुधिवरे येथील प्रतिपंढरपूर, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट लोणावळा ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.
या ठिकाणी पर्यटक जाणार नाही याची खबरदारी घेत आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यावर केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश प्रांत अधिकारी शिर्के यांनी मावळ तालुक्यातील सर्व पोलीस, अधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत.