पाचगणी – पाचगणीजवळील मुख्य मार्गावर मॅप्रो गार्डनसमोर आराम बसने मागून ठोकरल्याने नीरज अरुण मेहता (वय ४६, रा. घाटकोपर इस्ट, मुंबई) या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की शनिवारी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मौजे गुरेघर (ता. महाबळेश्वर) गावाच्या हद्दीतील मॅप्रो गार्डनच्या पार्किंगचे गेट नंबर एकसमोर नीरज मेहता पाठीमागून येणाऱया गाडीस रस्ता दाखवण्याकरिता थांबले असताना गेट नंबर एकच्या पार्किंगमधून आराम बसने (केए २१ ए ८४६) भरधाव वेगात येऊन रस्त्यावर उभे असलेल्या नीरज मेहता यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत नीरज मेहता गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु ,ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात पराग महेश शहा (वय 41, रा. 503 /504 भावेश्वर दर्शन, आनंदजी लेन ,घाटकोपर इस्ट ,मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पाचगणी पोलिसांनी बस चालक दिगंबर कृष्णा नाईक ((वय 43, रा. अंकोला, कर्नाटक) याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादविस कलम 279, 304 (अ), मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माने तपास करीत आहेत.