खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयाच्या नव्या इमारती जवळील डि पॉल ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या नविन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका परप्रांतिय मजुराचा खून झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सानू निमाई बिस्वास (वय २५ वर्षे, रा.पश्चिम बंगल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून ख्रिश्चन मिशनरीच्या डि पॉल या शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठेका घेतलेल्या ठेकेदाराने सेंट्रींगचे काम चंद्रशेखर गुलाबराव मगर यांना दिले होते. त्यांनी या कामासाठी पश्चिम बंगाल येथून २० कामगार आणले होते. कामाच्या ठिकाणी सर्व कामगार एकत्र राहून काम करीत होते.
लॉकडाउनच्या काळात १५ कामगार गावी परत गेले. मात्र ५ कामगार अडकून होते. या परप्रांतियात सोमवारी रात्री आपापसात लाथा-बुक्याने मारहाण करीत वादविवाद सुरू झाला. रागाच्या भरात राहुल राजव्यापारी मोंडल व सुकल मंगल हेमब्रास याने सानू निमाई बिस्वास याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. संबंधित ठेकेदाराने सानूला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोणी येथे पाठविण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.
दरम्यान, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिगंबर ज्ञानदेव होगे यांच्या फिर्यादीवरून राहुल राजव्यापारी मोंडल (रा. राजेग्राम नदिया प.बंगाल) व सुकल मंगला हेमब्रास (रा. बमन बाग्राम प.बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.