नवी दिल्ली – गेल्या 900 दिवसांत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओने सुमारे 300 प्रकल्प देशाला समर्पित केले आहेत. यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची कितीही प्रशंसा केली तरी ते कमीच आहे. रस्ते, पूल, धावपट्टी, हेलिपॅड आणि बोगदे यांच्या बांधकामाचा समावेश असलेल्या 90 प्रकल्पांचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. जम्मूला लागून असलेल्या सांबा जिल्ह्यात बीआरओच्या देवक नदीपूलासह अन्य 90 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, एक काळ असा होता कीबीआरओद्वारे कोणताही प्रकल्प करायचा असेल, तर सर्वप्रथम तो प्रकल्प सुरू होण्यासाठी खूप वेळ लागत असे. सुदैवाने प्रकल्प सुरू झाला तर, त्यामध्ये कागदपत्रांचे अनेक अडथळे येत असत. त्यामुळे असे प्रकल्प पूर्ण व्हायला मोठा काळ जात असे आणि प्रकल्पाचा खर्च अंदाजपत्रकापेक्षा जास्त होत असे. सध्या बीआरओने ठराविक ठिकाणी प्रकल्प सुरू केला आहे आणि ठराविक वेळेत पूर्णही केला आहे, असे मला दररोज ऐकायला मिळते. प्रकल्पाची जलद पूर्णता हे तुमच्या सर्वांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचे फळ आहे.
संरक्षणमंत्र्यांनी विविध राज्यांतील सत्ताधारी पक्षांच्या सहकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष सत्तेत आहेत. मात्र सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या उभारणीत आम्ही सर्वजण एकमेकांना साथ देत पुढे जात आहोत. या सहकार्याबद्दल मी माझ्या वतीने सर्व राज्य सरकारांचे अभिनंदन करतो.
राजनाथ सिंह शेवटी म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही किमान गुंतवणूक आणि कमाल मूल्य या मंत्रावर काम केले आहे. पण आता पर्यावरणाचा किमान ऱ्हास, राष्ट्रीय सुरक्षा आणि जास्त कल्याण हा मंत्र घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे.
काय आहे देवक नदी पूल?
जम्मूजवळील देवक नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची किंमत 3306.83 लाख रुपये आहे. त्याची लांबी 422.900 मीटर आहे. पुलाचे बांधकाम 26 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू झाले आणि 20 जून 2023 रोजी पूर्ण झाले. या पुलावरून राजपुरा हे बिष्णाशी जोडले गेले आहे. त्यामुळे सीमाभागातील सैनिकांसह नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.