नगर –भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होणाऱ्या बाल दिनानिमित्त जी.एस.ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने येत्या गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी नगरच्या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्यांमध्ये सुमारे 300 पेक्षा जास्त विद्यार्थी पंडित नेहरू यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होऊन मै भी नेहरू या या उपक्रमात त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शहरातील पालक व विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक व प्राचार्या आकांक्षा ढोरजकर यांनी केले आहे.
सकाळी 8 वाजता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पंडित नेहरूजी यांच्या कक्षा पर्यंत पंडित नेहरूजी यांच्या वेशभूषेमधील सुमारे तीनशे मुले व त्यांचे पालक यांच्या माध्यमातून फ्रीडम रॅली काढण्यात येणार आहे.राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते अमोल बागुल यांच्या हस्ते रॅलीला प्रारंभ होणार आहे. पंडित नेहरू यांच्या कक्षासमोर हे विद्यार्थी राष्ट्रगीत गायल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेणार आहेत.
तसेच डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध या ग्रंथाची प्रतिकृती देखील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असणार आहे.या उपक्रमांमध्ये विद्यार्थी स्वतः स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण देखील करणार आहेत. इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ हे स्वातंत्रय संग्राम व किल्ल्याची माहिती देणार आहेत.या उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोजकांकडून नेहरू टोपी, गुलाबाचे फुल व डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाची प्रतिकृती देण्यात येणार आहे.
पंडितजी नेहरू यांच्या वेशभूषेतील लांब सलवार व कमीज ही वेशभूषा विद्यार्थ्यांनी घरूनच करून यावयाची आहे.सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रम एक तासाचा असेल. पालकांनी स्वतः विद्यार्थ्यांना त्याठिकाणी घेऊन येणे आवश्यक आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून एल.अँड टी. चे अरविंद पारगावकर, इतिहास अभ्यासक संतोष यादव, फाउंडेशनचे अध्यक्ष सिताराम ढोरजकर,संचालक आदर्श ढोरजकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.