नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यांत 30 वेळा इंधन दरवाढ नोंदली गेली.
सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या विश्रामानंतर मागील महिन्यात (4 मे) पहिल्यांदा दरवाढ केली. तेव्हापासून दरवाढीचे सत्रच सुरू झाले आहे. मे आणि जून महिन्यांतील दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 7.71 रुपयांनी, तर डीझेल 8.12 रुपयांनी महागले आहे.
सततच्या दरवाढींमुळे महाराष्ट्रासह 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल दराने याआधीच शंभरी ओलांडली. ताज्या दरवाढीमुळे तो टप्पा ओलांडणारे तमिळनाडू हे दहावे राज्य बनले आहे. राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे.
राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांत डीझेल दरानेही याआधीच शंभरी पार केली आहे. इंधन दरांच्या भडक्यामुळे विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. भरमसाठ दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, सरकारकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या चढ्या दरांकडे बोट केले जात आहे.