सिमला – हरित आणि स्वच्छ हिमाचलचे ध्येय साध्य करण्याच्या उपक्रमात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सर्व सरकारी विभागांना १ जानेवारी २०२४ पासून डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी वाहने खरेदी न करण्याचे निर्देश दिले आहेत. .
मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, “‘ग्रीन अँड क्लीन हिमाचल’ उपक्रम मोठ्या प्रमाणावर ई-वाहनांना प्रोत्साहन देतो. गरज भासल्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच संबंधीत विभागांना पेट्रोल किंवा डिझेल वाहने खरेदी करता येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणापासून राज्याच्या पर्यावरण रक्षणासाठी चिकाटीने प्रयत्न हाती घेतले आहेत. त्यांचा हा निर्णय याच उद्दीष्ठाचा भाग मानला जात आहे.
सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, सरकारी ई-वाहनांची संख्या १८५ वर पोहोचली आहे, तर राज्यात नोंदणीकृत खाजगी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २७३३ इतकी आहे,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्री स्वता वीजेवर चालणाऱ्या गाडीतून प्रवास करीत आहेत. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे आणि त्यासाठी आजपासूनच पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.