लोणी काळभोर – येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या टँकर चालकांनी दि. 1 ते 3 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारला होता; मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे संप टळला असून, कंपनीतून पेट्रोल डीझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे.
सरकारने अपघाताविषयी कायदा निर्माण केला आहे. अपघातासाठी चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख दंड असा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे पेट्रोल पुरवठा करणार्या इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. या संपाला प्रतिसाद देण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एचपीसीएलच्या टँकर चालकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
या संपाची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण त्वरित पोलिसांचा फौजफाटा घेऊन एचपीसीएल कंपनीत दाखल झाले. शशिकांत चव्हाण यांनी चालकांची समजूत काढून मध्यस्थी केली. हा नियम केवळ टँकर चालकांना नाही तर सर्व चालकांना असणार आहे. या नियमाची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरून नये, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर चालकांनी संप मागे घेतला. संप घेतल्यानंतर एचपीसीएल कंपनीतून पुन्हा पेट्रोल डीझेलचा पुरवठा सुरळीत सुरु झाला.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, बीपीसीएलचे प्रबंधक दीपायण रॉय, इंडियन ऑइलचे प्रबंधक सुभाष रक्षित, एचपीसीएलचे प्रबंधक अखिल पांडे, पुणे पेट्रोल डीझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपरेल, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदार रामदास मेमाणे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“टँकर चालकांनी संप पुकारला होता; मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे चालकांनी संप मागे घेतला आहे. सध्या कंपनीतून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
-सुभाष रक्षित, प्रबंधक इंडियन ऑइल