Petrol and Diesel – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर प्रत्येकी २ रूपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. नवे दर शुक्रवारी (दि.१५ मार्च) सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतील. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे.
सार्वजनिक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन दरांचा आढावा घेऊन नियमितपणे देशातील इंधन दरांमध्ये बदल करतात. मात्र, त्या प्रक्रियेत जवळपास दोन वर्षे खंड पडला होता. आता सार्वजनिक कंपन्यांनी दर कपात केल्याने देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रूपयांना आणि डीझेल ८७.६२ रूपयांना उपलब्ध होईल.
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी इंधन स्वस्त होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. कोट्यवधी भारतीयांचा समावेश असलेल्या आपल्या परिवाराचे हित आणि सुविधा हेच आपले सदैव लक्ष्य असल्याचे यशस्वी पंतप्रधानांनी पुन्हा सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले.