मुंबई – वरळीत एका २९ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. निताशा बंगाली असे डॉक्टर महिलेचे नाव असून भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन निताशाने आत्महत्या केली आहे. एमबीबीएस करणाऱ्या निताशाला आपण डॉक्टर होणार की नाही याची सतत भीती सतावत होती. त्यामधूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे.
निताशा ही आई-वडील व भावासोबत वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत वास्तव्यास होती. तिचे आई, भाऊ, मावशी डॉक्टर आहेत तर वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. निताशा केईएममध्ये पदव्युत्तरच्या तृतीय वर्षाला होती. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ती रुग्णालयातून घरी परतली. त्यानंतर तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतला. संध्याकाळी आई घरी आली तेव्हा निताशा बेशुद्धावस्थेत हाेती. तिला तत्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले.
वरळी पोलीस ठाण्यात या आत्महत्येप्रकरणी नोंद करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.