मुंबई : राज्यात दोन दिवसापासून सुरु असलेला अनलॉकचा गोंधळ अखेर मध्यरात्री संपला आहे. कारण राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात ७ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरकारने म्हटले होते . त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही झाली. मात्र खेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨 pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
अशी होणार पाच टप्प्यात जिल्ह्यांची वर्गवारी
पहिला गट
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.