26 बालकांनी आई-वडील गमावले

जिल्ह्यातील करोना परिस्थिती : प्रशासन घेणार काळजी

पुणे  -करोनामुळे जिल्ह्यातील 26 बालकांनी आई आणि वडिल गमावले आहेत. या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देवून त्यांचे संरक्षण, संगोपन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्‍विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, “करोनामुळे आई आणि वडिल गमावलेल्या बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. या बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी. त्यासाठी गृहभेटी द्याव्यात.’ अशा बालकांची सविस्तर माहिती समन्वयकांना उपलब्ध करण्याचे आदेश देत डॉ. देशमुख म्हणाले, “चाइल्ड हेल्पलाइन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल, याची दक्षता घेण्यात यावी.’

ज्या बालकांचे दोन्ही पालक करोनाने दगावले आहेत, त्या बालकांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांच्या भरोसा सेलची टीमही गृहभेटी देणार आहे. या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे.
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.