मास्क न घातल्याने 258 जणांची तुरुंगात रवानगी

इंदौर – मध्य प्रदेशात गेल्या पाच दिवसांत मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळलेल्या 250 हून अधिक नागरिकांना तात्पुरत्या तुरूंगात पाठविण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार, इंदौरमधील स्नेहलतागंज परिसरातील एकावेळी 300 लोकांची क्षमता असणाऱ्या एका कम्युनिटी गेस्टहाऊसमध्ये तात्पुरते तुरुंग उभे करण्यात आले आहे, असे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राकेश कुमार भांगरे यांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसांत शहरातील विविध भागातील एकूण 258 लोकांना या तात्पुरत्या कारागृहात आणण्यात आले आहे. हे लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरत होते. तात्पुरत्या कारागृहातील या कैद्यांना साधारणत: प्रवेशानंतर तीन तासांत सोडण्यात येते. हा उपाय अवलंबण्यापूर्वी, मास्क न घालता आढळलेल्या लोकांना यापुढे सर्व कोविड -19 विरोधी मार्गदर्शक नियमांचे पालन केले जाईल, असा बॉन्ड लिहून देण्यास सांगितले जायचे, असे ते म्हणाले.

मास्क न घातल्याबद्दल पोलिसांकडून मारहाण

मास्क न घातल्याबद्दल जाब विचारल्यानंतर झालेल्या बाचाबाचीदरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या व्यक्‍तीने आगोदर पोलिसांना शिवीगाळ आणि नंतर हल्लाही केला, असे पोलिसांनी सांगितले. या व्हिडीओमध्ये, त्याला पोलीस रस्त्यावर बेदम मारताना दिसत आहेत. तर दोन तरुण स्त्रिया आणि एक किशोरवयीन मुलगा दयेची याचना करताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.