नारायणगाव – जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन संचलित मोहन ठुसे रुग्णालयातर्फे महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 257 महिलांची नेत्रतपासणी करण्यात आली, त्यापैकी 68 महिलांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. स्मिता डोळे यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, गौरी बेनके, राजश्री बोरकर, उषा कानडे, ओमशांती केंद्रच्या संगीताबेन, अरुण थोरात, जयश्री डोके, अर्चना माळवदकर, नेहा पाटील, पुष्पलता जाधव, मनीषा गावडे, कविता थोरात, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. वर्षा गुंजाळ, ऍड. वर्षा पोटे आदी महिला उपस्थित होत्या. डॉ. मनोहर मेडिकल फाउंडेशन गेल्या 38 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नेत्ररुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. डोळ्यांच्या आरोग्य विषयीच्या समस्यांसाठी समाजातील गोरगरिबांना अत्याधुनिक दर्जाचे उपचार मोफत उपलब्ध झाल्याने डोळे फाउंडेशन डोळ्यांच्या आरोग्यासाठी सक्षम असल्याचे गौरवोद्गार गौरी अतुल बेनके यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्मिता डोळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या अडीच वर्षांचा लेखाजोखा मांडला व भविष्यात चष्मा संपूर्ण घालविण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान नारायणगावसारख्या ग्रामपंचायत असलेल्या गावात सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ननवरे यांनी केले. आभार शितल ठुसे यांनी मांडले.