आणखी १७ जण विलगीकरण कक्षात

18 खासगी रुग्णालयांमध्ये बेड्‌सची सुविधा


आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

पुणे – शहरात मंगळवारी करोनाचे पाच रुग्ण सापडले असून, त्यातील एकामध्ये करोनाचे सर्व लक्षणे आढळून आली आहेत. तर अन्य चौघांमध्ये सौम्य लक्षणे असून, या पाचही जणांची प्रकृती स्थिर आहे. तर नव्याने दाखल झालेल्या दहा व्यक्‍तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल बुधवारी संध्याकाळी प्राप्त झाले असून ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 8 वर गेली असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नायडू रुग्णालयात एकूण 17 रुग्णांवर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे दहा रूग्ण दुबई येथील सहलीहून पुण्यात आलेल्या व्यक्‍तींशी संपर्कात आले आहेत. दरम्यान, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्‍तींची माहिती घेतली जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शासकीय रुग्णालयांसह 18 खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले असून, बेड्‌सची सुविधा आहे. सध्या केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या 28 विषयानुसार नियोजन सुरू असून, आवश्‍यकता भासल्यास प्रशासनाकडून बदल करण्यात येतील. तसेच कॅन्टोन्मेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि सीईओ यांच्याशीही चर्चा झाली असून, त्यांच्याकडून बेड्‌सची सुविधा ठेवण्यात येईल.

आवश्‍यकता असेल तरच प्रवास करावा; अन्यथा टाळावा
आजारी व्यक्‍तींनी घरातच थांबावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये. आवश्‍यकता असेल तरच प्रवास करावा, अन्यथा टाळावा. जेणेकरून प्रादुर्भाव टाळता येईल. घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावे. खोकताना आणि शिंकताना रुमाल किंवा आपली भाही लावावी. साबणाने हात स्वच्छ धुवावे, असा सल्ला विभागीय आयुक्‍त यांनी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.