नगर – काही सदस्य लग्न सोहळ्यासाठी तर काहीजण परगावी गेल्याने कोरमअभावी महापालिका स्थायी समितीची सभा आज तहकुब करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सभा होणार असल्याचे सभापती मुदस्सर शेख यांनी सांगितले.
सभेला सभापती शेख व सुवर्णा जाधव हे केवळ दोन सदस्य उपस्थित होते. आज दुपारी 1 वाजता महापालिकेची स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली होती. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र भाडेतत्त्वावर देणे, केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्प 2017-18 अंतर्गत तीन ठिकाणच्या कामाची फेरनिविदा, हे दोन प्रमुख विषय आजच्या सभेसमोर होते.
या सभेस सभापती मुदस्सर शेख, सदस्या सुवर्णा जाधव, उपायुक्त सुनील पवार, नगरसचिव एस.बी. तडवी, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मनकर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
स्थायी समितीतील एकूण 18 सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने सध्या आठ सदस्यांवर स्थायी समितीची सभा होत आहे. कोरम पूर्ण होण्यासाठी आठ सदस्यांपैकी पाच सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, शेख व जाधव हे दोनच सदस्य सभेला उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकुब केल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान स्थायी समितीमधील एक सदस्याच्या घरी लग्न सोहळा असल्याने काही सदस्य या लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तर दोन सदस्य बाहेरगावी होते. एका सदस्याने महापालिकेत पाऊन न ठेवण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे सभेचा कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, सभा तहकुब करावी लागली.