नोएडा – उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये मध्य प्रदेशातील एका रहिवाशासह तीन जणांकडून 23 लाख रुपयांहून अधिक “बेहिशेबी रोकड” जप्त केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणाला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये वाढवलेल्या सुरक्षा तपासणीच्या वेळी ही रोकड जप्त करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास एका कारमधील व्यक्ती 20 लाख रुपये रोख घेऊन जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सय्यद कौसर अब्बास नावाच्या इसमास ताब्यात घेण्यात आले. तो नोएडाचा रहिवासी आहे.
दुसऱ्या एका घटनेमध्ये रविवारी पहाटे ग्रेटर नोएडामध्ये दोन वाहने थांबवून त्यांच्या मालकांकडून 3 लाख रुपयांहून अधिक बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. गौतम बुद्ध नगर येथील पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली असून अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अर्धा डझनहून अधिक वाहने जप्त केली आहेत.