सातारा – माण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या इमारतीचे सुमारे 23 कोटी इतके अंदाजपत्रक असून सर्व सोयीसुविधांनीयुक्त अशी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती पुढील तीन वर्षात उभी राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे उपस्थित होते. माण (दहिवडी) पंचायत समिती प्रशासकीय इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून ही इमारत प्रशासकीयदृष्ट्या कर्मचारी बसण्यासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी योग्य नाही. माण पंचायत समितीच्या दहिवडी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम मे. व्हेटर्नरी ऑफीस म्हसवड या जागेवर होणार आहे. या बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ 5 हजार 466.92 चारस मीटर इतके प्रस्तावित केले आहे. यासाठी 22 कोटी 98 लाख 71 हजार इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले.
नियोजित आराखड्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह विश्रांती कक्ष असणार आहे. या प्रशासकीय इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. या इमारतीचे काम हाती घेतल्यापासून जास्तीत जास्त तीन वर्षांत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. बांधकाम पूर्णतः दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. खिलारी यांनी दिली.
लिफ्टसह सर्व सोयीसुविधांयुक्त जिल्ह्यातील पहिली पंचायत समितीची इमारत दहिवडी येथे साकारण्यात येत आहे. या इमारतीचा प्लॅन अतिशय आकर्षक बनवण्यात आला असून लवकरच कोरेगाव पंचायत समितीच्याही नवीन इमारतीला मंजुरी मिळणार आहे. सातारा पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरु आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी (मुख्य कार्यकारी अधिकारी)