पिंपळे गुरव – दापोडी येथील बहुतांश भागांमधील ड्रेनेजलाइन ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरादारांत व रस्त्यावर दूषित पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त दै. प्रभातने प्रसिद्ध करताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून येथील ड्रेनेजलाइन नवीन टाकून समस्या सोडविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
दापोडीतील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. “ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे जलनिस्सारण विभाग, स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग यांच्या वतीने दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. येथील पिलाजी काटे चाळ, जयभीमनगर, आत्तार वीट भट्टी परिसरात कमी व्यासाच्या एकाच सांडपाणी वाहिन्यांवर सर्व सेवा वाहिन्या असल्याने स्वतंत्र वाहिन्या टाकून येणारे अडथळे काढण्यात येणार आहेत.
दापोडी येथील अंतर्गत गल्ल्यांमधून सांडपाणी वाहिन्या तुंबण्याच्या प्रकारामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अरुंद गल्ल्या, वस्ती चाळीचा भाग आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या जयभीमनगर, पिलाजी काटे चाळ, अत्तार वीटभट्टी परिसरातील रहिवासी नागरिकांच्या घरामध्ये पावसाळी पाण्यासह चेंबर तुंबल्याने घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागतो.
पाऊस आल्यावरच हा प्रकार घडत नसून येथील वीस ते पंचवीस घरांना तुंबलेली गटारे, तुंबलेल्या ड्रेनेजमुळे गेली अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्रश्न कायमस्वरूपी उपाययोजना करून सोडवावा, अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत होती. आजवर महापालिकेकडून यावर कायमचा तोडगा काढला नसल्याने स्थानिक रहिवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात गटार तुंबल्याने पावसाचे पाणी घरामध्ये शिरते त्यामुळे रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अधिकारी वर्ग यांनी दापोडीतील या भागाची पाहणी केली व यावर काही कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका स्वाती काटे येथील नागरिक व समाजसेवक रवी कांबळे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.